(रुपेश गोडीवले/विनायक पाटील)
पेण दि. ९|- मागील चौदा वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामाने चर्चेत असणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली. पेण तालुक्यातील खारपाडा ते आमटेम या भागातील हा पाहणी दौरा करताना एवढ्या समस्या आणि दुरावस्था आढळून आल्या आहेत की शिवसैनिकांनी अक्षरशः हा पोलखोल पाहणी दौरा ठरला असल्याचे म्हटले आहे. यावेळी बोलताना तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी रायगड जिल्ह्यातील खासदार आणि मंत्र्यांवर सडेतोड टीका करत नेहमी प्रवास करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना ही दुरवस्था दिसत नाही का असा सवाल केला आहे. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफोडे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, महिला उपजिल्हा प्रमुख दर्शना जवके, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, तालुका समन्वयक भगवान पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख निलेश म्हात्रे, शहर प्रमुख सुहास पाटील, युवा सेना अधिकारी योगेश पाटील, सरपंच नीता घरत, महेंद्र घरत, विभाग प्रमुख दीपक पाटील, गजानन मोकल, वसंत म्हात्रे, नंदू मोकल, कांचन थळे, राजू पाटील गुरुनाथ पाटील, उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, वैशाली गुरव, भारती गावंड, महानंदा तांडेल, समीर साटी यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
देशभरात दुरावस्थेच्या बाबतीत गाजलेल्या मुंबई - गोवा हायवेबाबत कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष टाकत नाही की आवाज देखील उठवत नाही. सामान्य जनतेला आणि प्रवाशांना होणारा त्रास यांना का दिसत नाही याचा विचार करून जनतेमध्ये महामार्गाबाबत नक्की का रोष आहे याची चाचपणी करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून आज मुंबई - गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यात आला. नव्याने तयार करण्यात आलेल्या महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आणि सिमेंट काँक्रिटच्या आत्ताच्या बांधकामातील बाहेर आलेल्या सळ्या यातून अक्षरशा या रस्त्याची दुर्दशा समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून एक प्रकारे ही रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पोलखोलच केली असल्याचे बोलले जाते. अगदी खारपाडा पासून पाहणी दौरा सुरू केल्यानंतर येथील खारपाडा गावाला असणाऱ्या सर्व्हिस रोडला गटाराचे बांधकाम केले नसल्याने पावसाचे सर्व पाणी ग्रामस्थांच्या घरामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान आणि रोगराईला सामोरे जावे लागत आहे. तर पुढे दुरशेत गावातील नागरिकांना महामार्गाचा रस्ता पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्याने या गावातील हजारो नागरिकांची गैरसोय होत आहे. तरणखोप येथे असणाऱ्या उड्डाणपुलावर देखील मोठमोठे खड्डे पडले असून दयनीय अवस्था झाली आहे. अशीच परिस्थिती उंबर्डे ते वाशी नका तसेच डोलवी उड्डाण पूल येथे देखील झाली असून सिमेंट काँक्रिटच्या नव्या कामाची चाळण झाली आहे. एकंदरीतच आजच्या शिवसेनेच्या पाहणी दौऱ्यातून एकच स्पष्ट झाले आहे की एवढे वर्ष होऊन आणि हजारो कोटी रुपये खर्च करून देखील या मुंबई - गोवा महामार्गाची दुरवस्था जैसे थे आहे हे मात्र स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्याचा विचार करता याच महामार्गावरून जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले, अदिती तटकरे, आणि जिल्ह्यातील सर्व आमदार नेहमी प्रवास करत असतात. मात्र त्यांनी कदाचित प्रवास करताना डोळ्याला पट्टी बांधली असेल पण सामान्य माणसांचे हाल यांनी कधीच पाहिले नाही. निगडे नदीच्या पुलावर जी अवस्था आहे, ती तातडीने दखल घेतली नाही तर भविष्यात सावित्री पुलावर जी दुर्घटना झाली ती इथे सुद्धा होऊ शकते आणि त्याला जबाबदार प्रशासन आणि शासन असेल.
समीर म्हात्रे (तालुका प्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)
या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांनी 2025 ची दिली होती, मात्र या फक्त वल्गना आहेत. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की यांचे पाहणी दौरे होतात पण ही आश्वासने फोल ठरली असून कोकणवासीयांची ही अवहेलना आहे. त्यामुळे आजच्या या पाहणी दौऱ्यातून सत्ताधाऱ्यांची आणि ठेकेदारांची पोलखोल झाली असून याचा आम्ही निषेध करत आहोत.
प्रसाद भोईर (संपर्क प्रमुख रायगड)