(विनायक पाटील/रुपेश गोडीवले)
पेण दि. १५:- आता सर्वत्र शिट्टी वाजणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. वडखळ व खारपाले विभागातील प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रत्येक कार्यकर्ता मनापासून काम करीत आहे. कार्यकर्त्यांकडून दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा तसेच प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता अतुल म्हात्रे यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे असे वक्तव्य माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी खारपाले विभागातील प्रचार रॅली दरम्यान बोलताना केले.
माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारासाठी काराव, गडब, ढोंबी, खारपाले, कोलेटी विभागात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकापसाठी वातावरण निर्मित होऊन कार्यकर्त्यांत जोश निर्माण झाला आहे. महिलावर्गाची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. यावेळी माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे, उमेदवार अतुल म्हात्रे, निलेश म्हात्रे आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेदवार अतुल म्हात्रे यांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित करून भविष्यात रोजगार उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. आपला विरोध विकासाला नसून विकासाच्या नावाखाली भकास करणाऱ्या प्रवृत्तीला आहे. येथील बेरोजगारी, रोजगार, पाणी प्रश्न, खारबंदिस्थिचे प्रश्न, एम एम आर डी ए व इतर प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेऊन त्यांच्यासाठी लढा देण्यासाठी व हे प्रश्न सोडवण्यासाठी मला विधानसभेवर पाठवा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.तसेच माझ्या शिक्षणाचा उपयोग मी येथील स्थानिक शेतकरी नागरिकांच्या विकासासाठी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.