(रुपेश गोडीवले/विनायक पाटील)
पेण दि. ११|- मळेघर ग्रामपंचायत हद्दीतील घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळेघर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव (वय ४८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ११ एप्रिल २०२५) रोजी रंगेहात अटक केली.
ही घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात घडली असून, याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे वकिल असून त्यांच्या आशिल यांना कोर्ट व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये सादर करण्यासाठी वडगाव (ता. पेण) येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक होता. त्यानुसार त्यांनी १७ मार्च २०२५ रोजी मळेघर ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. आशिल वयोवृद्ध असल्याने त्यांनी वकिल तक्रारदार यांच्या नावावर १० एप्रिल रोजी कुलमुक्त्यारपत्र तयार करून दिले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी १० एप्रिल रोजी ग्रामसेवक परमेश्वर जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधून या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार यांनी त्वरित नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार ११ एप्रिल रोजी पंचाच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली असता ग्रामसेवकाने खरोखरच पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लगेचच सापळा रचून कारवाई करण्यात आली आणि लाच स्वीकारतानाच जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पेण पोलिस ठाणे येथे पुढील तपास सुरू आहे.