(विनायक पाटील/रुपेश गोडीवले)
पेण-दि.१८ :- मराठा आरक्षणासाठी आवाज उठविणारे आणि राज्यभरात चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी शेकाप महाविकास आघाडीचे पेणचे उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच पेण-सुधागड-रोहा मतदार संघातील संपूर्ण मराठा समाजाला अतुल म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले आहे. अतुल म्हात्रे यांनी नुकतेच आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समर्थकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. समाजाला त्रास देणाऱ्याना पाडून बदला घ्यायची हीच वेळ आहे अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. ज्याप्रकारे लोकसभेच्या निवडणुकीला मी मराठा समाजाला सांगितले होते, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. त्याप्रकारे आत्ताही मराठा आरक्षण मिळवीण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्यांना संपूर्ण मराठा समाज धडा शिकवेल. मराठा हा बुद्धिजीवी समाज आहे. त्यांना काय करावे आणि काय न करावे हे ताबडतोब लक्षात येते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. परंतु या निवडणुकीत मराठा समाजाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत होते. परंतु त्यानंतर त्यांनी माघार घेतली. आता ते कोणाला पाठिंबा देतात? यावर उमेदवार निवडून येणार की नाही हे ठरणार आहे. मराठा समाज हा करेक्ट कार्यक्रम करतो.
पेण विधानसभेचे उमेदवार अतुल म्हात्रे हे उच्च शिक्षित असून त्यांनी लंडन मध्ये जाऊन आर्किटेक्ट पदवी मिळविली आहे. तसेच जनतेप्रति त्यांचे व्हिजन चांगले असून पेण-सुधागड-रोहा मतदार संघातील सर्व मराठा समाजाला मी अतुल म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी आवाहन करत आहे असे त्यांनी सांगितले.